जळगाव विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे नंदकिशोर महाजन विक्रमी मतांनी विजयी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विक्रमी ५८२ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.
निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बैठका, समन्वय मेळावे, मतदार संपर्क अभियान आणि संघटनात्मक नियोजनामुळे महायुतीची ताकद अधिक प्रभावीपणे समोर आली. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजूट या निकालातून अधोरेखित झाली आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट, प्रभावी संघटनशक्ती आणि लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व करत महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.
नंदकिशोर महाजन यांना मिळालेली विक्रमी ५८२ मते ही केवळ विजयाची आकडेवारी नसून महायुतीच्या नेतृत्वावर, विकासाच्या राजकारणावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर व्यक्त झालेला विश्वास आहे. जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या समर्पणामुळे हा विजय शक्य झाला असून आगामी काळातही विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नंदकिशोर महाजन यांच्या या विक्रमी विजयाने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला असून हा विजय खऱ्या अर्थाने महायुतीच्या एकजुटीचा, विकासाच्या राजकारणाचा आणि जनविश्वासाचा विजय ठरला आहे.


