भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रिपोर्टमध्ये घोळ प्रकरण : कौस्तुभ लॅबकडून चूक मान्य; रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत

कौस्तुभ लॅबच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; “प्रिंट मिस्टेक”च्या स्पष्टीकरणाने वाढल्या शंका

सावदा, ता. रावेर मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरात अलीकडेच एका पॅथॉलॉजी लॅबच्या चुकीच्या तपासणी अहवालामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची चर्चा रंगली होती. आता संबंधित अहवाल हा कौस्तुभ पॅथॉलॉजी लॅबचा असल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, वैद्यकीय निदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, पाटील आडनावाच्या एका रुग्णाला कौस्तुभ लॅबकडून देण्यात आलेल्या तपासणी अहवालात काही निष्कर्ष नमूद करण्यात आले होते. हा अहवाल पाहिल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पुढील वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी अहवालातील बाबींवर शंका व्यक्त करत दुसऱ्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पुनर्तपासणी करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार दुसऱ्या लॅबमध्ये तपासणी करण्यात आली असता, नव्याने प्राप्त झालेला अहवाल पहिल्या अहवालापेक्षा लक्षणीयरीत्या वेगळा असल्याचे समोर आले. यामुळे मूळ अहवालाच्या अचूकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, रुग्णाने यासंदर्भात कौस्तुभ लॅबकडे विचारणा केली असता, अहवालात “प्रिंट मिस्टेक” झाल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर सुधारित अहवाल देण्यात आल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली आहे.

या संदर्भात “मंडे टू मंडे न्युज” ने कौस्तुभ लॅबशी संपर्क साधून भूमिका जाणून घेतली असता, लॅब प्रशासनाने त्यांच्या स्तरावर चूक झाल्याचे मान्य केले. मात्र, वैद्यकीय निदानासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारच्या चुका किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

मागील तक्रारी पुन्हा चर्चेत

विशेष म्हणजे, हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित लॅबविरोधातील जुन्या तक्रारींचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीदेखील संबंधित पॅथॉलॉजी लॅबकडून चुकीचे तपासणी अहवाल देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या वेळीही अहवालांच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. सध्याच्या प्रकरणामुळे त्या जुन्या घटनांची पुन्हा आठवण करून नागरिकांकडून अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे

विशेष म्हणजे, चुकीच्या अहवालामुळे रुग्णाला मानसिक तणाव, अनावश्यक भीती तसेच चुकीच्या उपचारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांकडे केवळ तांत्रिक किंवा मुद्रणदोष म्हणून पाहता येणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

या प्रकरणी संबंधित रुग्णाने अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, या घटनेच्या अनुषंगाने आणखी काही गंभीर बाबींची चर्चा शहरात सुरू असून, वस्तुस्थितीची निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!