भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकाराजकीयरावेर

नगराध्यक्ष पदाच्या राखीव आरक्षणामुळे सावद्यात ‘कही खुशी, कही गम’ !इच्छुकांचे स्वप्न भंगले ! मनसुब्यांवर पाणी… समीकरणे बदलणार !

मुख्य संपादक– भानुदास भारंबे…….
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून उत्सुकता आणि धाकधूक निर्माण करणाऱ्या येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार दि. ६ ऑक्टोंबरला जाहीर झाले आणि अनेकांना अनपेक्षित धक्का बसला. मंत्रालयात झालेल्या सोडत प्रक्रियेत हे महत्त्वाचे पद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित केले आहे. या अनपेक्षित आरक्षणामुळे सावद्याच्या राजकारणात मोठे बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गज पुरुष आणि महिला उमेदवारांचे पत्ते क्षणार्धात कट झाले. यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षांवर मनसुब्यावर पाणी फेरले असून सावदा शहरात स्मशान शांतता पसरली आहे. इच्छुकांमध्ये सकाळपासून असलेल्या ‘आरक्षण काय पडणार?’ या चिंतेचे रूपांतर आता ‘कही खुशी, कही गम’ अशा संमिश्र वातावरणात झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या सर्व तयारीवर पाणी पडल्याची चर्चा सावदा शहरात होत आहे. मात्र, या बदलामुळे काही इच्छुक कार्यकर्त्यांनी रणनीती बदलत इतर अनुसूचित जाती प्रवर्ग महिला (एस.सी.) प्रमाणपत्र असलेल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. ही ‘सुवर्ण संधी’ आता काहींच्या पत्नींसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

आरक्षण जाहीर होऊन लगेचच परिसरात वातावरण बदललेले दिसत आहे. काही कार्यकर्ते निराश झालेत, तर काही नव्या संधीची प्रतीक्षा करीत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या नव्या आरक्षणामुळे राजकीय खेळी अधिक गडद अन् रंगीबेरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. मात्र आता धाकधूक संपली पण धक्का मात्र बसला.

त्यामुळे नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून संपर्क वाढविलेल्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. सावदा शहरात प्रामुख्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार ) हे महायुतीचे घटक पक्ष , राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना उबाठा असे प्रामुख्याने पक्ष असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष महायुती म्हणून पालिकेची निवडणूक लढवणार की स्वतंत्र, लढवून एक मेकांच्या विरोधात उभे ठाकणार ? हे येणारा काळच सांगेल.

जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण एससी महिलांसाठी झाल्याने आता या महत्त्वाकांक्षी पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी कोणत्या राजकीय पक्षाकडून महिला चेहरा कोण असेल? कोणाला संधी मिळेल? या नव्या समीकरणांमुळे येत्या काळात सावद्याच्या राजकारणाला कोणती कलाटणी मिळते, हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Bhanudas Bharambe

पत्रकारिता क्षेत्रात ३८ वर्षांपासून कार्यरत संपादक म्हणून गेल्या २२ वर्षांपासून अविरत कार्य करत असून बऱ्याचशा दैनिकांमध्ये कामांचा अनुभव

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!