खिर्डी येथे मोकाट कुत्र्यांमुळे पशुपालक त्रस्त,ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु. येथे मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पशुपालकांच्या गाई, म्हशी, शेळ्या व लहान जनावरे यांच्यावर अनेक वेळा मोकाट कुत्र्यांनी हल्ले करून जनावरे जीवाला मुकली आहेत.तसेच मोकाट कुत्र्यांचे संकट पशूपालकांसमोर निर्माण झाले आहे. यामुळेच शेतकरी वर्गाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाअसून लहान मुले, पाळीव प्राणी यांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये खिर्डी खु येथील ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वर्षापासून हा प्रश्न उद्भवला असून वेळोवेळी या प्रश्नाकडे ग्राम पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच सद्यास्थितीत ही भयंकर परिस्थिती ओढावलेली आहे अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये मध्ये सुरू आहे.
पूर्वी मोकाट कुत्र्यांना पकडून विशिष्ट पद्धतीने नष्ट केले जायचे. परंतु प्राणिमित्र संघटनांनी, नागरिकांनी न्यायालयीन लढा देऊन ही पद्धत बंद केली. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार असतो हा विचार निश्चितच महत्त्वाचा आहे. मोकाट कुत्र्यांना नष्ट करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर त्यांची संख्या सतत वाढू लागली. दिवसा ही कुत्री फारशी कुठेही दिसत नाहीत, परंतु रात्री आठनंतर गल्ली-गल्लीतून रस्त्यावर फिरताना दिसतात. प्रसंगी सामान्य माणसेही त्यांची शिकार ठरतात. त्यामुळे सरकारने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी मोहीम उघडली खरी; पण तिचे अपयश सर्वसामान्य माणूस दररोज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ही मोहीम राबवताना कोणत्या त्रुटी राहून जातात याचा सामान्य नागरिक म्हणून विचार करताना ब-याच गोष्टी जाणवतात. यामुळेच या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभिर्याने पहावे अशी अपेक्षा पशुपालक व्यक्त करीत आहेत.