महाराष्ट्र हादरला! आश्रम शाळेतील नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म ; आरोपी निघाला अल्पवयीन नातेवाईकच
नाशिक, मंडे टु मंडे न्यूज | नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात, सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली असून, आश्रमशाळांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आणि देखरेख व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी हा देखील अल्पवयीन असून तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह
विद्यार्थिनी दीर्घकाळ गर्भवती असतानाही ही बाब संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्रमशाळेत दोघांची भेट कशी झाली, विद्यार्थिनीच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली का आणि देखरेखीत नेमका कुठे हलगर्जीपणा झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. तसेच विद्यार्थिनींची दर १५ दिवसांनी नियमित आरोग्य तपासणी होत असल्याचा दावा केला जातो. मात्र या घटनेनंतर त्या दाव्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात पोस्को कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून संबंधित अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती नाशिक आदिवासी विकास भवनाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.


