सर्वात मोठी कारवाई! दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश… १००० लिटर दुधात ५०० लिटर पाणी….
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | नुकत्याच उघडकीस आलेल्या एका मोठ्या रॅकेटमध्ये, १,००० लिटर शुद्ध दुधात तब्बल ५०० लिटर बनावट दूध (किंवा पाणी) मिसळल्याचे समोर आले आहे. वास न येणारा शाम्पू, दूध पावडर, घातक रसायने आणि पामतेल वापरून हा बनावट दुधाचा साठा तयार केला जात होता.
अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांच्या तपासानुसार, दुधाची मात्रा वाढवण्यासाठी, दुधामध्ये फेस तयार करण्यासाठी नफेखोर वास न येणारे शाम्पू आणि डिटर्जंट्स चा वापर करत होते. व दुधाची घनता (Solid-Not-Fat) कायम ठेवण्यासाठीvदूध पावडर (SMP) आणि रसायने तर दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाण्याचा वापर (उदा. १००० लिटर दुधात ५०० लिटर पर्यंत).अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. हे विषारी दूध थेट बाजारातील नामांकित ब्रँड्स आणि स्थानिक डेअरींना पुरवले जात होते, ज्यापासून पुढे खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात होते.
दुधात भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलीस आणि धडाकेबाज आयएएस ऑफिसर तुकाराम मुंडे आयुक्त असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे.
पुणे, सोलापूर, सांगलीसह तब्बल ६ जिल्ह्यांत एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल अडीच कोटी रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत
तपासात समोर आलेली भेसळीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि नागरिकांचे डोळे पांढरे करणारी आहे. दूध उत्पादकांकडून डेअरीत येणाऱ्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात होती. ५०० लिटर दुधात सुमारे ३०० लिटर, तर १००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटरपर्यंत भेसळ केली जात होती. दुधाची मात्रा वाढवण्यासाठी त्यात वास न येणारा शॅम्पू, दुधाची पावडर, घातक रासायनिक पदार्थ आणि पाणी मिसळून हे बनावट दूध तयार केले जात होते. हे विषारी आणि भेसळ युक्त दूध बाजारातील नामांकित ब्रँड्स आणि कंपन्यांना पुरवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, याच दुधापासून बनलेले पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांच्या घरा घरांपर्यंत पोहोचत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भेसळ कशी ओळखायची?दुधात स्टार्च (पिष्टमय पदार्थ) किंवा डिटर्जंट आहे का, हे तपासण्यासाठी दुधात ‘आयोडिन’ टाकून पाहा; जर दुधाचा रंग निळा झाला, तर दूध बनावट आहे.
पांढरेपणा: जर दूध खूप जास्त पांढरे दिसत असेल, तर त्यात डिटर्जंट किंवा युरिया असण्याची शक्यता असते.


