पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण ; दोन महिने अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | लाडकी बहीण योजना व मजुरीचे जमा झालेले पैसे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी वापरू, असे आमिष दाखवून एका ३० वर्षीय विवाहितेचे तिच्या ८ वर्षीय मुलासह अपहरण करून तब्बल दोन महिने डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यात उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते. तिचे पती वेगळे राहत असल्याने ती आई-वडिलांकडे वास्तव्यास आहे. गावातील एका महिला कंत्राटदाराकडे काम करत असताना तिने लाडकी बहीण योजना आणि मजुरीचे मिळून सुमारे ७० हजार रुपये जमा असल्याची माहिती दिली होती. हे पैसे दागिने करण्यासाठी वापरू, असे सांगून तिला अमळनेर येथे बोलावण्यात आले.
मंगळग्रह मंदिर परिसरात आल्यानंतर संशयित सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) याने तिला दुसऱ्या वाहनात बसवले. विरोध केल्यास तुला व तुझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत आरोपीने तिचे अपहरण केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर पीडितेला बहाळ (ता. चाळीसगाव) येथील झोपडीत काही दिवस ठेवून नंतर शिरपूरजवळील एका तांड्यावर नेण्यात आले. या काळात मुलाला मारण्याची भीती दाखवत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १६ जून २०२६ रोजी आरोपी बाहेर गेल्याची संधी साधून पीडित महिला मुलासह तेथून पसार झाली. तिने कमखेडा येथील बहिणीच्या घरी आश्रय घेतल्यानंतर नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अपहरण व बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनेची दखल घेत तपासाला गती दिली. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मजिद मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला १४ जुलै २०२६ रोजी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


