यावल तालुक्यातून विवाहिता आणि दोन बालकांचे अपहरण; गुन्हा दाखल
यावल.मंडे टु मंडे न्युज || तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातून २४ वर्षीय विवाहिता आणि तिच्या १२ वर्षीय मुलासह १० वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावत पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी बुद्रुक येथील २४ वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलांसह राहत होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने या तिघांना काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि त्यांना सोबत पळवून नेल्याचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधितांचा शोध घेण्यात आला. मात्र, विवाहिता आणि दोन्ही बालके आढळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तिन्ही व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


