ऑगस्ट मध्ये सुरू होणार जळगाव जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम..
जळगाव, मंडे टु मंडे न्युज |महाराष्ट्रातील १५ हजार १५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे。राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून, ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान मतदान होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४-२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
- प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: २४ जुलै.
- हरकती व सूचना दाखल करणे: २४ जुलै ते २९ जुलै
- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे: ४ ऑगस्ट
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग केव्हाही अधिकृतपणे निवडणुकीचा कार्यक्रम (मतदान आणि मतमोजणीच्या तारखा) घोषित करू शकतो.
संपूर्ण महाराष्ट्रात गावकारभाऱ्यांच्या निवडीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या रणसंग्रामात थेट सरपंच निवड पद्धत असल्यामुळे गावपातळीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गावातील स्थानिक आघाड्या, पॅनल आणि प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंतिम मतदार याद्यांवर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
१५ जुलै २०२६ ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २४ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. हरकतींची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर ४ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मतदार यादी
प्रसिद्ध होईल. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात काही ग्रामपंचायतींमध्ये त्रुटी आढळल्याने सुधारित कार्यक्रमही लागू केला आहे. त्यानुसार संबंधित ग्रा.पं. साठी विशेष ग्रामसभा, प्रारूप अधिसूचना व अंतिम अधिसूचना प्रसिद्धीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना मुदतीत हरकती किंवा सूचना दाखल करता येणार आहेत.
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी पात्र ग्रामपंचायती—
चोपडा तालुका ग्रामपंचायती – ५२
यावल तालुका ग्रामपंचायती- ४७
रावेर तालुका ग्रामपंचायती – ४८
मुक्ताईनगर तालुका ग्रामपंचायती – ५६
बोदवड तालुका ग्रामपंचायती – २९
भुसावळ तालुका ग्रामपंचायती – २६
जळगाव तालुका ग्रामपंचायती – ४२
धरणगाव तालुका ग्रामपंचायती – ५०
अमळनेर तालुका ग्रामपंचायती – ८०
पारोळातालुका ग्रामपंचायती – ६१
एरंडोल तालुका ग्रामपंचायती – ३७
जामनेर तालुका ग्रामपंचायती – ८०
पाचोरा तालुका ग्रामपंचायती – ९६
भडगाव तालुका ग्रामपंचायती -३५
चाळीसगाव तालुका ग्रामपंचायती – ८६
एकूण – ८२५
जिल्हा परिषद निवडणूक लांबणार
दरम्यान, राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ६ ऑगस्टनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हैद्राबादहून नव्याने दाखल होणाऱ्या मतदान यंत्रांचा या निवडणुकीत वापर केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका आटोपल्यानंतरच जिल्हा परिषदेची निवडणुक होईल, असा दावा प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे.


