सावद्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला ; स्वामीनारायण नगरवासीयांमध्ये संताप
सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा शहरातील स्वामीनारायण नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील काही नागरिकांमध्ये डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित रुग्णांना डेंग्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे किंवा नाही, याबाबत आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे.
स्वामीनारायण नगर परिसरात साचलेले पाणी, गटारीतील अस्वच्छता आणि डासांची वाढती संख्या यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय, सावदा येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पथकाने स्वामीनारायण नगर परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी केली. यावेळी पथकाने नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या तसेच आवश्यक ती सतर्कता बाळगण्याबाबत मार्गदर्शन केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील आणि मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष घालून परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी, धूरफवारणी तसेच व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तसेच प्रभाग क्रमांक १ मधील दोन्ही नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणीही रहिवाशांकडून करण्यात आली आहे.डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, गटारींची नियमित स्वच्छता करणे आणि परिसरात नियमित औषध व धूरफवारणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन नगरपालिका प्रशासनाने विलंब न करता स्वामीनारायण नगर परिसरात तातडीने फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.या वेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना निवेदन देताना यश चंद्रशेखर भैरवा,नगरसेवक सुरज परदेशी,अजहर खान,शेख रऊफ कुरेशी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

