मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : भाजपा प्रचार कार्यालयाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि मंत्री श्री. संजयजी सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या भाजपा अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि मंत्री श्री. संजयजी सावकारे यांनी सर्व अधिकृत उमेदवारांसह शहरातील प्रवर्तन चौकात जाऊन संविधान दिन निमित्त शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीतील युती न होण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्हाला शिवसेनेकडून नऊ जागांसाठी युतीचा प्रस्ताव आला होता.” परंतु, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद आणि एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर, भाजप स्वबळावर सहज जिंकू शकते, “स्थानिक परिस्थिती बघता आम्ही युतीचा प्रस्ताव नाकारला आणि स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.” आणि भाजप येथे नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत असून नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमताने भाजपला विजय मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त करत महाजनानी मुक्ताईनगरचा गड पुन्हा काबीज करणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमास मंत्री श्री. गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री श्री. संजयजी सावकारे, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बावस्कर, श्री. नंदकिशोर महाजन, श्री. अशोक कांडेलकर, डॉ. केतकी पाटील तसेच सर्व भाजपा अधिकृत उमेदवार, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
