चार-सहा महिन्यात शिंदे सरकार कोसळणार,ठाकरे गटाच्या नेत्या च भाकीत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आज खासदार संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. या दोन्ही नेत्यांचं विधान ताजं असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे सरकार केवळ चार सहा महिनेच राहील, असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे भाकीत वर्तवलं. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज आहेत. त्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं. त्यावर, त्यांच्यातील नाराज आमदार आमच्यात येतील. तसं चित्रं दिसत आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुहास कांदे यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दादा भुसेंवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल सुहास कांदेंनी खदखद व्यक्त केली. यापूर्वी अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या दालनातून चिडचिड करत बाहेर आले होते. चौकशी टाळण्यासाठी प्रताप सरनाईकांनी पक्ष बदलला. पण तरीही त्यांच्या मागचा चौकशीची ससेमिरा सुटलेला नाही. सरनाईक त्यांचा मतदारसंघ भाजपला सोडत नाही, तोपर्यंत भाजप त्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ देणार नाही. या सर्व कारणाने हे सरकार कोणत्या दिशेने जातंय हे स्पष्ट होतंय, असं त्या म्हणाल्या. हे असंच कुरघोड्यांचं राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचं राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं.
दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश रखडला आहे. त्यावरूनही त्यांनी टोला लगावला. तिकडं प्रवेश केला पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर ठिक आहे. सत्तास्थानी प्रवेश करणं सोप्पं असतं. कारण तिकडे करीअर पटकन होतं. पण संघर्ष काळ सहन करणं अवघड आहे. आज आमची शिवसेना संक्रमणकाळात आहे. पण आम्ही लढायचं ठरवलं आहे. जे जात आहे. त्यांना शुभेच्छा. आम्ही लढत राहणार आहोत, असा टोला त्यांनी लगावला. भाजप नेत्या मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत नाही, तोपर्यंत भाजपचा त्यांच्या प्रवेशाला विरोध राहील असं मृणाल पेंडसे म्हणाल्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचा प्रवेश लांबवला असावा. या मुद्द्यावर भाजप त्यांचा प्रवेश करून घ्यायला तयार नाही असं चित्रं आहे, असा चिमटा त्यांनी काढला.