आता ठरलं! ‘या’ तारखेला होणार शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात शिंदे आणि फडणवीसांचं सरकार सत्तेवर आलं असून, धडाडीचे निर्णय घेण्यासही सुरुवात झालीय. पण शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यावरून विरोधकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. साधारण १९ किंवा २० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन बोलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून महाराष्ट्राला नवे मंत्रिमंडळ काही अद्याप मिळालेले नाही. आता 20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात असून, पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. शपथ देण्यात येणाऱ्या मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या काही चेहऱ्यांचा समावेश असणार आहे.
18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याकारणान पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. आता पावसाळी अधिवेशन 24 ते 25 जुलैपर्यंत होऊ शकतं, असंही सांगितलं जात आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील पाच ते सहा मंत्री, तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची संपूर्ण रूपरेषा तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 28 मंत्री केले जाणार असून, त्यापैकी आठ राज्यमंत्री असतील. भाजपकडे गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, ऊर्जा, ग्रामविकास, क्रीडा आणि महसूल या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या याचिकेवर सुनावणीही प्रलंबित आहे. ही सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय १८ जुलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी दुसरी शक्यता आहे. तसेच दिल्लीतून भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर कोणत्याही दिवशी म्हणजे आषाढी एकदशीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागू शकतो, असेही सांगण्यात येते.