भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळेनाशिक

बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?

नाशिक/धुळे/जळगाव.मंडे टु मंडे न्युज | : राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या तुषारकुमार साळुंके याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे. तपासादरम्यान सुमारे २३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथितरीत्या बनावट शालार्थ आयडी आणि मान्यता आदेश मिळवून देण्यात त्याची भूमिका असल्याचे समोर आल्याचे पोलिस तपासातील वृत्त आहे.

लॅब असिस्टंट ते कथित ‘शालार्थ एजंट’
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, साळुंकेला संगणकीय ज्ञान असल्याचा फायदा घेत त्याने शालार्थ प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांच्या निर्मितीत हस्तक्षेप केला. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रशांत वाडीले याच्यासोबत संगनमत करून विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक मान्यता, कायम मान्यता, संचमान्यता तसेच शालार्थशी संबंधित कागदपत्रे तयार करून घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नोंदीतही फेरफार?
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील जावक नोंदवहीत कथित खाडाखोड करून बनावट क्रमांक नोंदविण्यात आल्याचे तपासात आढळल्याचे सांगितले जात आहे. या कथित बनावट मान्यता आदेशांच्या आधारे ऑनलाइन शालार्थ प्रणालीमध्ये संबंधितांची नावे समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन?
पोलिसांच्या तपासानुसार, कथित बनावट शालार्थ आयडीच्या आधारे काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत तसेच नियमित वेतन मंजूर झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ बनावट कागदपत्रे तयार करण्यापुरते मर्यादित न राहता सरकारी निधीतून वेतन वितरणापर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनेक शाळा तपासाच्या कक्षेत
या प्रकरणाच्या तपासात धुळे जिल्ह्यातील विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त्या, मान्यता आदेश आणि शालार्थ प्रक्रियेची छाननी सुरू आहे. दोंडाईचा येथील वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालयासह तावखेडे, कर्ले, देवपूर, शिरडाणे, बुरझाड, पिंपळनेर आणि इतर शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याचे वृत्त आहे.

७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक शहर गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. साळुंकेला न्यायालयात हजर केल्यानंतर ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे नेमकी कुठे तयार करण्यात आली, जिल्हा परिषद कार्यालयातील नोंदींमध्ये कथित फेरफार कोणी व कसा केला आणि या प्रक्रियेत आणखी किती शिक्षक-कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला, याचा तपास सुरू आहे.

२३३ शाळा, ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीखाली
यापूर्वीच्या तपासात उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून शालार्थ आयडी प्रस्तावापर्यंतच्या कागदपत्रांची शहानिशा सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे साळुंकेशी संबंधित सांगितला जाणारा २३ कर्मचाऱ्यांचा प्रकार हा या मोठ्या तपासातील केवळ एक भाग आहे की यामागे आणखी मोठे जाळे आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.

पोहोचणार का SIT संपूर्ण साखळीपर्यंत ?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता कथित बनावट कागदपत्रे तयार करण्यापासून ते शालार्थ आयडी आणि त्यानंतर सरकारी वेतन मंजूर होईपर्यंतची संपूर्ण साखळी नेमकी कशी कार्यरत होती? हा आहे.

शालार्थ आयडीसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी कोणत्या स्तरावर झाली? मान्यता आदेशांची सत्यता तपासण्याची जबाबदारी कोणाची होती? जिल्हा परिषद कार्यालयातील नोंदींमध्ये कथित फेरफार झाला असेल, तर तो कोणाच्या निदर्शनास का आला नाही? आणि सरकारी वेतन सुरू होण्यापूर्वी अंतिम पडताळणी नेमकी कुठे झाली?

या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे. त्यामुळे SIT या प्रकरणातील केवळ संबंधित व्यक्तींपर्यंत मर्यादित न राहता कथित संपूर्ण साखळीचा छडा लावणार का? तसेच या प्रकरणामागे आणखी कोणकोणाचे हात आहेत, हे पुढील तपासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!