सावदा सह दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | सावदा सह दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर संस्थेचे सचिव दिलीप बेंडाळे यांनी अहवाल वर्षातील ताळेबंद, व्यापारी व नफा-तोटा पत्रक तसेच संस्थेचा जमाखर्च सभासदांसमोर वाचून दाखविला. संस्थेचा आर्थिक व्यवहार समाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. यावेळी संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना सुरेश नामदेव चौधरी यांच्या हस्ते १० बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, अहवाल वर्षात दूध उत्पादकांना भावफरक देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. त्यानुसार म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर १० रुपये, तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ४ रुपये भावफरक सभासदांना देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेला मोठ्या नफ्यात आणून सभासदांना अधिक भावफरक मिळवून दिल्याबद्दल सचिव दिलीप बेंडाळे यांचे संचालक मंडळ व सभासदांनी कौतुक केले.
सभेच्या शेवटी संचालक श्री जगदीश बढे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.
सभेस चेअरमन रवींद्र बेंडाळे, व्हा. चेअरमन कुशल जावळे, संचालक जगदीश बढे, संजय चौधरी, भरत नेमाडे, देवानंद बढे, धनंजय चौधरी यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. संस्थेच्या एकूण १,१७४ सभासदांपैकी तब्बल ९५० सभासदांनी सभेला उपस्थिती लावली.


