वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश ; २ महिला ताब्यात, ६ पीडित महिलांची सुटका
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत शहरातील प्रताप हायस्कूल व तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शिल्पा राजू लामा (वय ३५, रा. चोपडा) सह पूजा टीकाराम थापा (वय २९, रा. चोपडा) या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिवाजी भिमराव पाटील (रा. चोपडा), फरीद कबीर शेख (रा. चोपडा), शाहबद वाहिद खान (रा. चोपडा), शरिफ सत्तार तडवी (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे (रा. चोपडा), फिरोजी हंसा खान (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे (रा. चोपडा), संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील (रा. चोपडा), सुरेंद्र राजपूत (रा. चोपडा) जि. जळगाव. हे ९ जण घटनास्थळावरून फरार झाले आहे.
पीडित महिला राजस्थान व नेपाळ येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांना संरक्षण व आवश्यक मदत पुरविण्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलिसांनी शिल्पा राजू लामा (वय ३५, रा. चोपडा) सह पूजा टीकाराम थापा (वय २९, रा. चोपडा) यांना ताब्यात घेतले असून आरोपी क्रमांक ३ ते ११ हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

