पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोक प्रतिनिधीची जबाबदारी आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ व धमकी दिल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आघात झाला असून लोकशाही मूल्यांना धक्का बसला आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे आणि आक्रमक भाषेमुळे सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी वापरलेली अरेरावी आणि धमकी देण्याची भाषा करत संतापून “माझ्या नादाला लागला तर एकतर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल,” “पुन्हा समोर आल्यास मारून पाठवणार “अशी उघड धमकी दिली.
पत्रकार हे जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे निषेधार्ह आहे. या घटनेबाबत अनेक राजकीय नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली असून अशा वर्तनाचे समर्थन करता येणार नाही, असे मत मांडले आहे.
“पत्रकारांचा अपमान सहन केला जाणार नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी,” अशी मागणी पत्रकार व नागरिकांमधून होत आहे


