बायोडिझेल पंपांवर धाड : आठ जणांविरोधात गुन्हे दाखल
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासनाने २७ सप्टेंबर रोजी संयुक्त कारवाई करत मलकापूर शहर व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन अवैध बायोडिझेल पंपांवर धाड टाकली. या धाडीत जमिनीत पुरलेल्या टाक्यांमध्ये डिझेल सदृश्य द्रव्य साठवून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळले. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मलकापूर शहर हद्दीतील धरणगाव शिवारातील हॉटेल फौजी धाब्याजवळ आणि रणथम गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हॉटेल एकता जवळ हे पंप आढळून आले. पुरवठा निरीक्षक कु. धनवर्षा हरणे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले असून आरोपींमध्ये मो. नईम शेख, शाकीर खान मास्टर, लखन पांचाळ, इम्रान खान, अरशद तेली, सय्यद अब्दुला सय्यद हराकूब, शेख इम्रान शेख इस्माईल व खान यांचा समावेश आहे. सदरचे कृत्य आवश्यक वस्तू अधिनियम १९५५, मोटार स्पिरीट बॅण्ड हाय स्पीड डिझेल सदृश्य पदार्थ रेग्युलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस ऑर्डर २००५ तसेच पेट्रोलियम उत्पादने (उत्पादन, साठवणूक व पुरवठा देखभाल) ऑर्डर १९९९ मधील तरतुदींचा भंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास उपपोनि सतीष बेले व सपोनि हेमराज कोळी करीत आहेत.

