मुक्ताईनगरातील नागरिकांना भुसावळकडे जाताना जीवघेण्या खड्ड्याशी करावा लागतोय सामना
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | शहरातील भुसावळ रोडवर हॉटेल मुक्ताई पॅलेस समोर पडलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी धोक्याचे कारण ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रश्नाकडे चक्क दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सदर खड्डा एवढा मोठा झाला आहे की पावसाळ्यात त्यात पाणी साचल्यावर तो पूर्णपणे दिसेनासा होतो. त्यामुळे छोटे-मोठे अपघात रोजच घडत असल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस नसतानाही या खड्ड्यातून जाणाऱ्या वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? की त्याआधीच उपाययोजना होणार?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.हा खड्डा तातडीने बुजविण्यात आला नाही तर परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा नागरिकांनी इशारा दिला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

