भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आ. अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर व यावल तालुक्यात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले असून गहू व मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रावेर-यावल परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. जोरदार वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोठ्या प्रमाणावर मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी बागांना मोठा फटका बसला आहे. सध्या अंधार असल्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज स्पष्ट झालेला नसून उद्यापासून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

उद्यापासून सकाळी लवकर पंचनामे : आमदार अमोल जावळे . वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला उद्यापासून सकाळी लवकर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!