जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले
नवी दिल्ली,मंडे टु मंडे न्युज| जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार व गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत उपस्थित करत केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्र्यांचे लक्ष वेधले. या प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) कडून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच केंद्रातील जुनी झाडे अनधिकृतपणे तोडणे, ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर करणे अशा गंभीर अनियमितताही उघड झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
संसदेत बोलताना वाघ म्हणाल्या, “कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. मात्र जळगावमधील केंद्रात शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. माझ्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनेक त्रुटी व गैरप्रकार समोर आले.”
हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही मांडण्यात आला होता, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्देशानुसार कार्यरत राहतील, याची खात्री करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, या प्रकरणावर कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संबंधित केंद्राबाबत नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार वाघ यांनी हा मुद्दा संसदेत मांडत शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.

