जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री ; अमळनेर व जळगावात FDAची धडक कारवाई
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अमळनेर आणि जळगाव शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत दोन्ही ठिकाणांहून एकूण १ लाख ६ हजार ३२५ रुपये किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा व उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
अमळनेरात ७२ हजारांचा साठा जप्त
२३ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर येथील रवींद्रनगर परिसरात प्रियदर्शनी रजाळे यांच्या घराची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी ७२ हजार ३९२ रुपये किमतीची विविध सौंदर्यप्रसाधने व संबंधित साहित्य आढळून आले.
जळगावातही कारवाई
त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील महाबळ परिसरात राशी तलरेजा यांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. येथे ३३ हजार ९३३ रुपये किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला.
विनापरवाना उत्पादनाचा संशय
दोन्ही ठिकाणी विविध प्रकारचे लेबल असलेले तसेच विनालेबल क्रीम, पावडर आणि जेल स्वरूपातील उत्पादने आढळून आली. याशिवाय प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि सौंदर्यप्रसाधनांच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्यही आढळले. या उत्पादनांसाठी कोणताही वैध उत्पादन परवाना नसल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले. तसेच आवश्यक गुणवत्ता तपासणी न करता सौंदर्यप्रसाधनांची साठवणूक व विक्री केली जात असल्याचा संशय आहे.
जप्त केलेल्या मालातील काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आह.
ही कारवाई सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने, नाशिक विभागाचे सह-आयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना उत्पादनाच्या लेबलवर उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदतबाह्यता तारीख यांसह आवश्यक माहिती नमूद आहे की नाही, याची खात्री करूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करावीत, असे डॉ. अस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

