मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्याला साडे सहा लाखांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | मंत्रालयातील महाराष्ट्र राज्याच्या अर्थ आणि नियोजन विभागाचा एक मोठा मासा लाच लुचपत विभागाच्या गळाला लागला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात रंगेहात अटक केली.मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेतल्याचं ही दुसरे प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी अडवणूक करून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम ६ लाख ३७ हजार रुपये स्वीकारताना विलास लाड याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मंत्रालयातील कामासाठी अशा प्रकारे उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी एसीबीकडून
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीने त्याला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन अटक केली होती. मंत्रालयात खुद्द मंत्र्याच्या केबिनमध्ये शिरून एसीबीने ही कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.
