भुसावळ मध्ये खळबळ : एक हजारांची लाच ; भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई, सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ. मंडे टु मंडे न्युज || जमीन मोजणीसंदर्भातील अर्जातील त्रुटी दूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. शुक्रवारी केलेल्या सापळा कारवाईमुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनंतर एसीबीची पडताळणी
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन मोजणीसंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जातील त्रुटी दूर करून देण्यासाठी कार्यालयातील शिपाई सचिन पाटील याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी करून सापळा रचला. या कारवाईदरम्यान भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर परिसरात सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण यानेही लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली.
योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सापळा कारवाई यशस्वी केली.
जमीन मोजणीसारख्या शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्याच्या या प्रकरणामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात पुढील कायदेशीर कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.


