रावेर तालुक्यात खळबळ! महिला सरपंच अपात्र
रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर ता लुक्यातील पातोंडी येथील लोकनियुक्त सरपंच नम्रता समाधान कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. जळगावचे अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामुळे रावेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पातोंडी येथे सन २००३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाची जागा आरक्षित होती. या जागेवरून नम्रता समाधान कोळी यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
या प्रकरणी पातोंडीचे माजी सरपंच मोहन दशरथ बोरसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हरकत नोंदवून चौकशी व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या तक्रारीवर वेळोवेळी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित वेळेत सादर न केल्याच्या मुद्द्यावरून अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नम्रता कोळी यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई केली.
दरम्यान, या कारवाईबाबत नम्रता समाधान कोळी यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई झाल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच याबाबत आपली प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील अधिकृत आदेशातील तपशील आणि पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


