हतनूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक सतत वाढत असल्याने, पुढील काही तासांत हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढू लागली असून, पाणी साठ्यातही वाढ होत आहे.त्या मुळे तापी आणि पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर राहणाऱ्या नागरिकांनी, तसेच शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकत असल्याने नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचना देण्यात आल्या असून असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या हतनूर धरणात धरण प्रशासनाने रात्री 9.00 वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी 211.510 मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) 214.000 मीटर आहे. धरणात सध्या 257.50 दशलक्ष घनमीटर (Mm³) म्हणजे 66.37 टक्के एकूण जलसाठा असून, उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा 124.50 दशलक्ष घनमीटर (48.82 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
सध्या धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.5 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 72.0 क्युमेक्स (2,543 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून 0.71 क्युमेक्स (25 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
धरण परिसरात रविवारी 6 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 34 मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी दुपारी 4.00 वाजता धरण प्रशासनाने पूर सतर्कता (Flood Alert) जारी करत तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातून पुढील काही तासांत पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगत नदीपात्रात किंवा नदीकाठावर अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


