भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

पशुवैद्यकीय पदविकाधारकांचेप्रलंबित मागण्यांसाठी २२ जून रोजी पुण्यात धरणे आंदोलन

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | दि. २२ जून : –
पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालय, औंध (पुणे) येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

राज्यातील हजारो पदविकाधारक पशुवैद्यक ग्रामीण व दुर्गम भागात पशुधन विकास, कृत्रिम रेतन, दुग्ध व्यवसाय, पशुरोग नियंत्रण तसेच पशुपालकांना सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असूनही त्यांच्या विविध न्याय्य मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य दुय्यम पशुवैद्यकीय परिषद विधेयक शासकीय विधेयक म्हणून तातडीने मंजूर करणे, बोव्हाईन ब्रीडिंग अँक्टमधील त्रुटी दूर करून संबंधित पदविका अभ्यासक्रमांचा समावेश करणे, कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना आवश्यक साहित्य, मानधन व विमा संरक्षण उपलब्ध करून देणे तसेच दंडात्मक तरतुदींमध्ये सुसंगत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेत नव्याने निर्माण झालेल्या पशुधन पर्यवेक्षक पदांची रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत, तसेच राज्यातील विविध विद्यापीठांच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रमांना शासन मान्यता देऊन पदविकाधारकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक हक्कांचे संरक्षण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या मागण्या केवळ पदविकाधारकांच्या हिताच्या नसून पशुपालक, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाशी थेट संबंधित असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास पशुसंवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

या आंदोलनात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो पदविकाधारक पशुवैद्यकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवासंघ संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक लोखंडे ,डॉ.शंकर झोपे, डॉ.संदीप भालेराव, डॉ.सोपान दुट्टे,डॉ.योगेश सूर्यवंशी, डॉ.विकास नवले,डॉ. दिपक शेवाळे, डॉ.प्रवीण पाटील ,डॉ.विवेक अडकमोल , डॉ.बाळू राठोड आणि सल्लागार डॉ. संजय पाटील (धुळे) यांनी केले आहे.

संघटनेने “पदविकाधारकांना न्याय – पशुसंवर्धन क्षेत्राला बळ” तसेच “नोंदणी, मान्यता आणि रोजगार हा आमचा अधिकार” या घोषणांद्वारे आपल्या मागण्यांवर भर दिला आहे.                स्थळ : पशुसंवर्धन
व दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालय, औंध, पुणे
तारीख: 22 जून
वेळ : सकाळी १० ते
सायं. ४

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!