जळगावात वाहतूक नियमभंग विरोधात कडक मोहीम ; कर्कश सायलेन्सर व बनावट नंबर प्लेट वर कारवाई
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | जळगाव शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः कर्कश आवाज करणारे सायलेन्सर व बनावट (फॅन्सी) नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.
सन २०२४ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर तपासणी करण्यात आली. या वेळी सुमारे २०० सायलेन्सर जप्त करण्यात आले. संबंधित वाहनचालकांकडून कंपनीचे सायलेन्सर काढून टाकून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले होते. अशा प्रकारच्या आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
याशिवाय, शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली असून सुमारे १५० नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. नुकताच जळगाव चा पदभार घेतलेले पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही समोर आले आहे. सन २०२४ मध्ये एकूण ९३१ अपघातांची नोंद झाली असून त्यात ४५० प्राणघातक अपघात होते. या अपघातांत सुमारे ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे.
हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, तसेच कर्कश सायलेन्सर वापरणे अशा विविध नियमभंगांवर विशेष पथकांकडून कारवाई केली जात आहे. ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
