Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगावच्या नेरी नाका स्मशानभूमीत संशयास्पद विधी ; चितेजवळ नारळ, लिंबू, अंडे अन् दारूची बाटली आढळली, CCTV फुटेजमुळे खळबळ! अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच घडला प्रकार

जळगाव .मंडे टु मंडे न्युज ||  शहरातील नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी संशयास्पद विधी केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चितेजवळ नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती अशा वस्तू आढळून आल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात वास्तव्यास असलेले अनिल तुळशीराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. सोमवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास नेरी नाका स्मशानभूमीत हिंदू धर्मपरंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते.

मात्र, अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच या ठिकाणी संशयास्पद प्रकार घडल्याचे उघड झाले. सोमवारी दुपारी सुमारे चार वाजता अनिल चौधरी यांचे पुतणे रवींद्र चौधरी हे स्मशानभूमीत गेले असता, अंत्यसंस्कार झालेल्या जागेजवळ नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती ठेवलेली त्यांना दिसली. हे साहित्य पाहून त्यांनी अघोरी विधी अथवा अन्य संशयास्पद प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली कैद
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर स्मशानभूमीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक व्यक्ती हातात काही वस्तू घेऊन अंत्यसंस्कार झालेल्या जागेकडे जाताना आणि तेथे त्या वस्तू ठेवताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटेजमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.

नातेवाईकांचा संताप; कठोर कारवाईची मागणी
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अशा प्रकारे वस्तू ठेवण्यात आल्याने चौधरी कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहेत. स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी अशा संशयास्पद हालचाली होणे निषेधार्ह असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे, तेथे वस्तू ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय होता आणि प्रत्यक्षात कोणता विधी करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकारामागील सत्य समोर येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!