भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

पालखीतील शांत तेज – संत मुक्ताबाईंच्या सेवेत अखंड वाहणारे श्री.ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | आदिशक्ती संत श्रेष्ठ मुक्ताबाई महा तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील पालखी सोहळा प्रमुख श्री.ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे आज 61 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांच्या एकसष्टी निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत आहेत संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील सर्व संतांचे अभंग चरित्रकार श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील. वाचकांना महाराजांचा परिचय नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे.-संपादक


लेखक
श्रीगुरु प्राध्यापक रामकृष्णादादा महाराज पाटील पुणे

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ती स्वतः प्रकाशझोतात न येता दीपस्तंभासारखी वाट दाखवत राहतात. कीर्तनाच्या ओघात, पालखीच्या धुळीत, सेवेतल्या निष्ठेत आणि वाणीतील संयमात ज्यांचे अस्तित्व सहज जाणवते, असेच एक तेजस्वी पण शांत व्यक्तिमत्त्व म्हणजे मुक्ताईनगर येथील संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख, श्री.ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे. आज त्यांच्या एकसष्टी निमित्ताने त्यांच्या तपस्वी जीवनाकडे, सेवाव्रती कार्याकडे आणि संतपरंपरेतील योगदानाकडे पाहताना मन सहजच कृतज्ञतेने भरून येते.

_____________________________

श्री रविंद्र महाराज हरणे यांचा आणि आमचा परिचय 1990 पासून आहे. मी कन्या हायस्कूल मुक्ताईनगर या ठिकाणी उपशिक्षक असताना त्यांची भाची आमच्याकडे शिकायला होती. मुक्ताई मंदिरातून रोज तिला सकाळी शाळेत सोडायला आणि संध्याकाळी घ्यायला महाराज यायचे आणि आमची तेव्हापासून ओळख आणि पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. अशी आमची मैत्री आजपर्यंत टिकून आहे. मी महाराष्ट्रातील सर्व संतांची अभंगाचारित्रे लिहिले असताना आदिशक्ती मुक्ताबाई यांचे अभंग चरित्र लिहून झाले.

महाराजांनी कोणत्याही प्रकारची आढळवेढे न घेता माझ्या या अखंड अभंगा चरित्राला सुंदर अशी प्रस्तावना दिली. मुक्ताई चे निष्ठावंत सेवकच या ग्रंथाला उत्तम प्रस्तावना देऊ शकतात ही प्रेरणा सुद्धा अर्थातच आदिशक्ती मुक्ताबाईची!
अशा या त्याग मूर्ती तपस्वी हरिभक्तांचा जन्म २५ डिसेंबर १९६४ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील गावंडगाव या सुसंस्कृत भूमीत झाला. वैकुंठवासी आई कोकीळाबाई हरणे आणि वैकुंठवासी वडील गजाननराव गोविंदराव हरणे यांनी दिलेले संस्कार, साधेपणा, कष्टाची तयारी आणि श्रद्धा हेच त्यांच्या आयुष्याचे भांडवल ठरले. ग्रामीण मातीचा सुगंध आणि संतवाणीचे बीज त्यांच्या अंतःकरणात लहानपणापासूनच रुजले. पुढे मोठे बंधू, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थांचे व्यवस्थापक श्री‌.ह.भ.प. विनायकराव हरणे यांच्या मार्गदर्शनात हे संस्कार अधिक दृढ झाले.

१९८८ पासून मुक्ताईनगर येथे वास्तव्य करत असताना रवींद्र महाराजांनी आपले आयुष्यच संत मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण केले. गेली तब्बल ३५ वर्षे ते संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून अखंड सेवेत आहेत. ही सेवा केवळ पदाची नाही, तर ती साधनेची आहे, तपस्येची आहे आणि अहंकाररहित कर्तव्यभावनेची आहे. पालखी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर तो चालता-बोलता संस्कारयज्ञ आहे, आणि त्या यज्ञाचा यजमान म्हणून महाराजांनी जे संयम, शिस्त आणि समर्पण दाखवले, ते विरळाच. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून रवींद्र महाराजांचे नाव श्रद्धेने घेतले जाते. त्यांच्या कीर्तनात शब्दांचा गजर नसतो, तर भावांचा ओघ असतो. आवेश नाही, आडंबर नाही, पण श्रोत्यांच्या अंतःकरणाला भिडणारी सहज वाणी असते.

संतवचनांचे साधे पण खोल अर्थ उलगडताना ते श्रोत्यांना विचारमग्न करतात, अंतर्मुख करतात. म्हणूनच ते सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत — सामान्य वारकरी असो वा विद्वान श्रोता, प्रत्येकाला त्यांच्या कीर्तनात आपलेपण वाटते. त्याग हीच ज्यांची मूर्ती आहे, असे रवींद्र महाराजांचे व्यक्तिमत्त्व आहे. स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी अधिक जगणे, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून त्यांनी केवळ भौगोलिक परिक्रमा केली नाही, तर अंतःकरणाचीही परिक्रमा पूर्ण केली. त्या यात्रेने त्यांच्या जीवनात अधिक शांती, अधिक समतोल आणि अधिक करुणा आली. शांत स्वभाव, संयत वाणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.

आदिशक्ती मुक्ताबाईच्या पंढरपूर येथे निघणाऱ्या पालखी सोहळ्यातील व्यवस्थापन, वारकऱ्यांची काळजी, परंपरेची शुचिता आणि आधुनिक काळातील आव्हानांशी जुळवून घेतलेली कार्यपद्धती — या सगळ्याचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसतो. मोठ्या बंधूंसह आणि संस्थेतील सहकाऱ्यांसह त्यांनी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या परंपरेला केवळ जपले नाही, तर ती अधिक व्यापक आणि सुदृढ केली. आज एकसष्टीच्या या मंगल प्रसंगी रवींद्र महाराज हरणे यांच्याकडे पाहताना असे वाटते की वय ही केवळ संख्या आहे, खरी परिपक्वता सेवेतून येते. संतवाणीचा वारसा खांद्यावर घेऊन, अहंकारापासून दूर राहून, आणि श्रद्धेचा दीप अखंड तेवत ठेवणारे हे व्यक्तिमत्त्व पुढील पिढ्यांसाठी आदर्श आहे. संत मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित झालेले हे जीवन अधिक दीर्घायुषी होवो, त्यांच्या सेवेत अजून तेज येवो, आणि त्यांच्या शांत तेजातून महाराष्ट्राची वारकरी परंपरा अधिक उजळून निघो, हीच सदिच्छा.

लेखक
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील, पुणे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!