भोंदू अशोक खरातची भविष्यवाणी, “जेल मधेच माझे मरण” खरातला दिसू लागला स्वतःचा मृत्यू?
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दैवी शक्ती असल्याचे सांगून अनेकांचे भविष्य सांगणाऱ्या खरातने आता स्वतःचे भविष्य सांगितले आहे. त्याने आपल्या मृत्यूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पोलीस चौकशीत त्याने हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असे वाटत नाही. माझे मरण इथेच (जेलमध्ये) आहे,’ असे वक्तव्य खरात याने केले आहे. तसेच विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत खरातने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.
चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांचा ससेमिरा वाढल्यानंतर खरातने गुन्ह्यांची कबुली देत आता सुटका होणे शक्य नसल्याचे मान्य केले आहे. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, अध्यात्मिक शक्ती मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. याव्यतिरिक्त त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही खरातच्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे.
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सातत्याने चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेतल्यापासून त्याच्यावर अनेक गु्न्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याची चौकशी संपली की दुसऱ्या गुन्ह्याची चौकशी सुरु होत आहे. यामुळे सध्या अशोक खरात याची एसआयटीकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी सुरु आहे. यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागला आहे. याच अशोक खरात याने आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात याची मानसिक स्थिती सध्या खालावली आहे. ‘मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे’, असे तो चौकशीदरम्यान बोलल्याचे समजते. अशोक खरात याच्यावर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या यापैकी तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी त्याची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्याने चौकशीत फसवणुकीचा गुन्ह्याची कबूली दिल्याचे समजते. याशिवाय, अशोक खरात याच्यावर अनेक महिलांनी धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र, हा गुन्हा अद्याप अशोक खरात याने कबूल केलेला नाही. एसआयटीच्या आतापर्यंतच्या तपासात अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
अशोक खरात श्रीमंत भक्तांना दाखवायचा ईडीची भीती
अशोक खरातकडे जे भक्त येत होते, त्यापैकी खरात अंधविश्वास ठेवणाऱ्या श्रीमंत भक्तांची एक यादी तयार करत असे. या भक्तांना खरात तुमच्यावर ईडी किंवा आयकरची धाड पडेल, अशी भीती दाखवायचा. तुमचे पैसे माझ्याकडे ठेवा किंवा माझ्यासोबत जमिनीत गुंतवा, असे सांगून अशोक खरात या भक्तांकडून पैसे उकळायचा, असे चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, एसआयटीने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांची तीन बँक खाती सील केल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने दोघांच्याही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरु आहे. अशोक खरात याच्या नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी सुरु आहे. खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीकडून अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच ईडीकडूनही अशोक खरात याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे दिवसेंदिवस अशोक खरात याचा पाय खोलात चालला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा