प्रेमाची सर्वात महागडी किंमत! करवा चौथच्या दिवशी किडनी विकून पत्नीला दिला iPhone, मात्र ती प्रियकरा सोबत फरार!
फोनही गेला आणि किडनीही गेली, आता हा पती मारतोय रुग्णालयाच्या चकरा
गोरखपूर. मंडे टु मंडे न्युज || पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी पतीने केलेल्या त्यागाची एक धक्कादायक कहाणी सध्या चर्चेत आली आहे. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका पतीने चक्क स्वतःची किडनी विकून त्यातून मिळालेल्या पैशांतून तिला महागडा iPhone भेट दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ज्या पत्नीच्या आनंदासाठी त्याने स्वतःच्या आरोग्याशी तडजोड केली, तीच पत्नी करवा चौथच्या रात्री प्रियकरा सोबत घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.आता हा पती रुग्णालयाच्या चकरा मारत असून, पत्नीच्या प्रेमासाठी केलेल्या त्यागामुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे.
किडनी विकून पूर्ण केली पत्नीची इच्छा!
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला महागडा मोबाईल हवा होता. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीने स्वतःची एक किडनी तब्बल ६ लाख रुपयांना विकल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या पैशांतून त्याने पत्नीला खूश करण्यासाठी iPhone 16 खरेदी केला आणि करवा चौथच्या दिवशी प्रेमाने भेट दिला.
पत्नीला महागडी भेट मिळाल्याने तीही आनंदी असल्याचे सांगितले जाते. मात्र, या आनंदामागे पतीला भविष्यात एवढा मोठा धक्का बसेल, याची कल्पनाही नव्हती.
करवा चौथच्या रात्रीच पत्नी घरातून निघाली!
या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे करवा चौथच्या दिवशी पत्नीने व्रत ठेवले होते. पतीसोबत आनंदाचे क्षण टिपत तिने फोटोही काढले. रात्री चंद्रदर्शनाच्या निमित्ताने ती घराबाहेर पडली. मात्र, ती छतावर जाण्या ऐवजी प्रियकरा सोबत निघून गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
घरातून जाताना ती पतीने भेट दिलेला नवीन iPhone आणि काही दागिनेही सोबत घेऊन गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे पत्नीच्या प्रेमासाठी किडनी गमावलेल्या पतीवर दुहेरी संकट ओढवल्याचे सांगितले जात आहे.
‘फोनही गेला, किडनीही गेली आणि विश्वासही संपला!’
या घटनेनंतर पतीची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे सांगितले जात आहे. पत्नीच्या आनंदासाठी केलेला त्याग आणि त्यानंतर मिळालेली कथित फसवणूक यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. किडनी विकल्यामुळे त्याला आता आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.
‘पत्नीला आनंदी करण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलले. मात्र, तिच्या मनात माझ्या बद्दल प्रेमच नव्हते, हे मला माहीत नव्हते,’ अशा शब्दांत त्याने आपली व्यथा व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
प्रेमासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावू नका!
या कथित घटनेमुळे प्रेम, विश्वास आणि नात्यांमधील अपेक्षांबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नात्यासाठी स्वतःच्या आरोग्याशी आणि आयुष्याशी तडजोड करणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव या घटनेतून होते.


