जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ,माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह ४८ अधिकाऱ्यांना एसआयटीचे समन्स
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यभरात शिक्षण विभागातील शिक्षण विभागाला हादरवून टाकणारा घोटाळा उघडकीस आला असून या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने कारवाईचा जोर अधिक वाढवला असून आता जळगावच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह तत्कालीन ११ शिक्षणाधिकाऱ्यांसह एकूण ४८ अधिकाऱ्यांना एसआयटीने नोटीसा बजावल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यात शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा पगार लाटल्याचे समोर आले आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव मधील शाळांची तपासणी करून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. दरम्यान, या प्रकरणात आता १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडव्याच्या कार्यालयात सुनावणी होत असून याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बोगस आयडी तयार करण्यात आले व शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा पगार संबंधितांनी लाटला आहे. २०१३ ते २०२६ या काळात नाशिक विभागातील खाजगी व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील सुमारे ८१२ कर्मचाऱ्यांच्या आयडीत अनियमितता आढळली आहे.
एसआयटी ने तपासाच्या आधारावर तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून यात ११ तत्कालीन शिक्षणाधिकारी,२१ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्ष अधिकारी, २३ वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक अशा एकूण ४८ जणांची चौकशी दिनाक १५ ते १८ या तारखेच्या कालावधीत होणार असून सलग चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीत बनावट आय डी कशाच्या आधारे मंजूर करण्यात आले. या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा मोठा खुलासा उघड होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात ४८ जणांना नोटीसा
बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने ज्या ४८ जणांना नोटीस बजावली आहे, त्यात सध्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह आर.डी. विसपुते, एस.बी. हिंगोणेकर, एस.टी. बराडे, डी.पी. महाजन, बी.जे.पाटील, बी.एस. अकलाडे, डॉ. नितीन बच्छाव, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ. एम. व्ही. कदम यांच्यासह ११ उपशिक्षणाधिकारी, तीन कक्षाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांना आता नाशिकला होणाऱ्या सुनावणीसाठी सामोरे जावे लागणार आहे. या मुळे अनेक बड्या हत्तींचे धाबे दणाणले असून यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

