थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प! महिन्यातून एकदाच हजेरी लावणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा संताप; सरपंच- उपसरपंच गप्प का?
थोरगव्हाण,ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. संतोष राणे सर |थोरगव्हाण ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामविकास अधिकारी सौ. छाया नेमाडे या महिन्यातून फक्त एकदाच ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लावत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी, ग्रामस्थांची अनेक कामे अडकलेली असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांचा सवाल आहे — “मॅडम कोणाच्या राजकीय आशीर्वादाने महिन्यातून एकदाच येतात? सरपंच–उपसरपंच यांचे मॅडमच्या कारभारावर लक्ष नाही का?” अशा प्रकारचे प्रश्न सध्या गावभर चर्चेचा विषय बनले आहेत.
संपर्क साधला असता नेमाडे मॅडम सांगतात की, “माझ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे, त्यामुळे दररोज उपस्थित राहणे शक्य नाही.” मात्र ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या हालचाल रजिस्टरची (movement register) पाहणी करून ते सार्वजनिक करावे, म्हणजे प्रत्यक्षात कोणत्या गावाला किती वेळ दिला जातो हे स्पष्ट होईल.
ग्रामस्थांचा आरोप आहे की मॅडम स्वतःच्या घरातूनच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतात, आणि त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. संवादाच्या अभावामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि मॅडम यांच्यात वारंवार वाद निर्माण होत असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. या संदर्भात “मंडे टु मंडे न्युज” प्रतिनिधीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)श्रीमती मीनल करनवाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात आपण चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शौचालय बांधकामासाठी दिलेला अर्ज दोन–तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. या दिरंगाईमुळे पालक व शिक्षक वर्गातही नाराजीचे वातावरण आहे. “लहान विद्यार्थ्यांच्या अडचणीसुद्धा या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का?” असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांचे मत आहे की, वरिष्ठ अधिकारी व BDO यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी, आणि जर अधिकारी गावात नियमित उपस्थित राहू शकत नसतील, तर थेट प्रशासक नेमावा, जेणेकरून नागरिकांची कामे मार्गी लागतील.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
