आधी नगरपरिषदांच्या निवडणुका होणार? जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या,निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष्य
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनाक २७ नोव्हेंबर सोमवार रोजी गट व गणांची अंतिम मतदार यादी जाहीर होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम पुढे ढकलत १२ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम १५ दिवस पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्या. या निर्णयामुळे आधी नगरपरिषदांच्या निवडणुका होणार का? अशी शंका उपस्थित केली जात असून या बाबत चर्चेला उधाण आले आहे. या मुळे या निर्णयाची धास्ती घेत, इच्छुक उमेदवारांनी ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारले आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक पंधरा दिवस पुढे गेल्यानंतर अजूनही इच्छुकांनी चुप्पी साधली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे गेल्याने १२ नोव्हेंबरनंतरच राजकीय समीकरणांची अधिक स्पष्टता मिळणार आहे.
जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही संस्थांचा प्रभाग व मतदार यादीचा कार्यक्रम समान पातळीवर सुरू होता. परंतु, पहिल्यांदा पालिका अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलत ३१ ऑक्टोबरची तारीख दिली. आता त्यापुढे जाऊन जिल्हा परिषदेची अंतिम यादी पंधरा दिवस पुढे ढकलली आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही निवडणुका एकत्र होतात की काय, अशा चर्चा ही होत्या. परंतु, आज शेवटच्या दिवशीच आदेश काढून गट व गणाच्या अंतिम मतदार याद्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्याने आधी पालिका निवडणुका होतील, या चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेते या कडे राजकीय पक्ष व इच्छुकांचे लक्ष्य लागले आहे.
तीन नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील याद्या अधिप्रमाणित होतील, याच दिवशी या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध होईल. १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश आहेत. तसेच यादीतील दुबार नावांसंदर्भातील कार्यवाहीचे मार्गदर्शन स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या घडामोडींमुळे सध्या राज्यात निवडणुकीच्या धुरळ्याची चाहूल लागली आहे आणि आधी पालिका, मग जिल्हा परिषद निवडणुका होतील, हे आता जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

