गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी तिघांना अटक, १५७ गॅस सिलेंडर जप्त, जळगाव जिल्ह्यातील मोठी कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | फैजपूर व वरणगाव परिसरात घडलेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून १५७ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून असा सुमारे ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात ललित रघुनाथ राणे (वय ५८), संचालक श्रीधर गॅस एजन्सी, यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश करत भारत गॅस कंपनीचे १४.२ किलो वजनाचे भरलेले १०० सिलेंडर, एकूण ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला होता.तसेच, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात नरेंद्र उत्तमराव अहिर (वय ५१) यांनीही अशीच फिर्याद नोंदवली होती. त्यांच्या गोडाऊनमधून ७२ हजार ८४६ रुपयांचे ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेले होते. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद भारतीय न्याय संहिता कलमांनुसार करण्यात आली होती.
या गंभीर प्रकरणांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला. या तपासातून शेख विलाल शेख नवी (वय ३२, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्हे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली.
चोरट्यांकडून भरलेले ६२ गॅस सिलेंडर, ९५ रिकामे सिलेंडर आणि सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड असा एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यांची उकल करीत १५७ सिलिंडर पोलिसांनी जप्त केले असून त्यात भारत गॅसचे ६२ भरलेले व भारत गॅस कंपनीचे ९५ खाली सिलिंडरचा समावेश आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले सुझूकी गाडी (एम.एच.19 ईयु 8871) देखील जप्त करण्यात आली. अटकेतील सिलेंडर चोरट्यांना फैजपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ. प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशंवत टहाकळे, पो.ना श्रीकृष्ण देशमुख आणि पोलिस अंमलदार बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, गौरव पाटील, मिलींद जाधव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.
