वाघोदा बु. ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली गैरव्यवहार, सखोल चौकशीची मागणी
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तालुक्यातील वाघोदा बु ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक कामांची बिले नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत वार्ड क्रमांक २ चे सदस्य महेंद्र सुरेश काळे यांनी रावेर येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वार्ड क्रमांक २ मध्ये करण्यात येणाऱ्या गटारींचे काम अपूर्ण असतानाही संबंधित ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात आली.
तसेच या कामाचे इस्टिमेट तयार करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय स्ट्रीट लाईट व पेव्हर ब्लॉक खरेदीत आर्थिक तफावत, अंगणवाडी फिटिंगचे काम अपूर्ण असतानाही दोन महिने आधी बिल काढणे, तसेच बसस्थानक परिसरातील पाण्याची टाकी पाडण्याबाबत अफजल नामक
व्यक्तीकडून सुमारे चार महिन्यांपूर्वी घेतलेले ३५ हजार रुपये ग्रामनिधी खात्यात जमा न झाल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. तसेच जाहिरातींवरील वाढीव खर्च, जास्त प्रमाणात अनामत रक्कम काढणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामनिधी व आयोगाच्या निधीचे व्यवहार करणे आदी बाबींमध्येही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला
वाघोदा बु. ग्रामपंचायतीच्या कारभारात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच पूर्वीच्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या सर्व प्रकारांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची रावेरचे गटविकास अधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
