जळगाव, भुसावळमार्गे आणखी दोन विशेष ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस धावणार! वेळापत्रक आणि थांबे जाणून घ्या. दिवाळी साठी रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रत्येकी १२ फेऱ्या
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज ||सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हडपसर (पुणे) ते मुजफ्फरपूरदरम्यान आणखी दोन विशेष ‘अमृत भारत’ साप्ताहिक रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही गाड्यांना जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून, प्रत्येक गाडीच्या १२ फेऱ्या नियोजित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने नियमित रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. आरक्षण मिळवितानाही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिली विशेष गाडी २० ऑक्टोबरपासून
गाडी क्रमांक ०१४८१ हडपसर–मुजफ्फरपूर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर मंगळवारी हडपसर येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी गुरुवारी दुपारी १२ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१४८२ मुजफ्फरपूर–हडपसर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. शनिवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी ही गाडी हडपसर येथे पोहोचेल.
दुसरी विशेष गाडी १९ ऑक्टोबरपासून
गाडी क्रमांक ०१४५३ हडपसर–मुजफ्फरपूर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही १९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर सोमवारी हडपसर येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. बुधवारी दुपारी १२ वाजता ती मुजफ्फरपूर येथे पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०१४५४ मुजफ्फरपूर–हडपसर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. शुक्रवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी ती हडपसर येथे पोहोचेल.
जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबा
या दोन्ही विशेष गाड्यांना पुढील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत :
दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर आणि हाजीपूर.
जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने या परिसरातील बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
२२ डब्यांची असेल रेल्वे
या विशेष ‘अमृत भारत’ गाड्यांची रचना एकूण २२ डब्यांची असेल. त्यामध्ये ११ सामान्य श्रेणीचे डबे, ८ शयनयान श्रेणीचे डबे, १ पॅन्ट्री कार आणि दिव्यांग प्रवासी, सामान तसेच गार्डसाठी २ डबे असतील.
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना : प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित गाडीचे अधिकृत वेळापत्रक, जळगाव व भुसावळ येथील थांब्यांची वेळ आणि आरक्षणाची उपलब्धता रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी सेवेद्वारे तपासून घ्यावी.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

