यावल तालुक्यात एसीबीच्या ट्रॅप : कोतवाल लाच घेताना जाळ्यात !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करून देण्याच्या मोबदल्यात किनगाव येथील एका दुकानावर ५ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जहांगिर तडवी रा. किनगाव ता. यावल याने सातबारा उताऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ५ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार याने लाचलुचपत विभागाला तक्रार दिल्याने एसीबीने सापळा रचून मंगळवार २२ फेब्रुवारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच स्विकारतांना कोतवाल जहांगिर तडवी याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे किनगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.