गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
वरणगाव, ता. भुसावळ. मंडे टु मंडे न्युज | गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगताना वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळला गेला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. रवींद्र चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पो. नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला त्यात केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर, वरणगाव, ता. भुसावळ) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला सुमारे २५ हजारांचा गावठी कट्टा व २ हजार ५०० रुपयांचे ५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याला अटक करून त्याच्यावर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
