पोलिस ठाण्यातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपाने प्रयत्न फसला
यावल.मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील चिंचोली येथील पेट्रोल पंपावर तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर एका तरुणाने पोलिस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. २४) घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रकार रोखला. याप्रकरणी संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तरुणाविरुद्धही अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील पेट्रोल पंपावर समाधान धनगर व महेंद्र रूले हे दुचाकीने गेले होते. यावेळी शुभम पाटील याने महेंद्र रूले याला मारहाण केली, तर समाधान धनगर याला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर समाधान धनगर याने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत शुभम पाटील आणि महेंद्र रूले तेथून निघून गेले होते. पोलिसांनी समाधान धनगर याला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, त्याने शुभम पाटील याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांनी आधी तक्रार दाखल करावी लागेल, असे सांगितल्याने समाधान धनगर नाराज झाला. पोलिस पथकासोबत न जाता तो स्वतःच्या दुचाकीवरून पोलिस ठाण्यात आला. तेथे त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले.
दरम्यान, समाधान धनगर यांच्या फिर्यादीवरून शुभम पाटील याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच समाधान धनगर याच्याविरुद्धही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण –
याबाबत पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले की, ज्याला मारहाण झाली तो तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला नाही. तसेच शिवीगाळीची तक्रारही पोलिस ठाण्यात येऊन द्यावी लागते. ज्या प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांना थेट अटक करण्याचे अधिकार नाहीत, त्या प्रकरणात अटक करण्याची मागणी करत समाधान धनगर यांनी अंगावर पेट्रोल ओतून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.


