भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसावदा

डासांमुळे सावदेकर त्रस्त ; डासांच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सावदा.मंडे टु मंडे न्युज | सावदा शहरात डासांची उत्पत्ती ने डास मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांत डास प्रतिबंधक औषधांची नियमित फवारणी करून प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रावेर तालुक्यातील सावदा शहरातील अनेक मोकळ्या भूखंडांवर कचरा, झाडे-झुडपे आणि साचलेले पाणी असल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा घराबाहेर बसणेही कठीण झाले असून, सायंकाळच्या वेळेस परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सावदा शहरातील रविवार पेठ परिसर, गावात बाजार परिसर, जगमाता चौक परिसर, शिवाजी चौक परिसर, संभाजी चौक, बुधवार पेठ , स्वामीनारायण नगर, मोठा आड, गांधी चौक परिसर, चांदणी चौक, खाजा नगरी, साळी बाग, इंदिरा गांधी चौक, काजीपुरा, मढी परिसर, क्रांती चौक, पाटीलपुरा,ओम कॉलनी यांसह शहराच्या वाढीव भागासह शहरातील अनेक भागांत डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. पालिका प्रशासनाकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कधी तरी फवारणी होते, मात्र परिणाम दिसत नसल्याची तक्रार
पालिका प्रशासनाकडून अधूनमधून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाते. मात्र या फवारणीचा डासांच्या प्रादुर्भावावर अपेक्षित परिणाम होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नियमित आणि प्रभावी फवारणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुदतबाह्य औषध फवारल्याचा आरोप
यापूर्वी शहरात डास प्रतिबंधक औषधांची मुदत संपल्यानंतरही फवारणी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. या आरोपांची प्रशासनाने योग्य ती चौकशी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार व प्रभावी औषधांचाच वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डासांपासून बचावासाठी नागरिकांचा खर्च वाढला
डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांना डास प्रतिबंधक अगरबत्ती, कॉईल आणि लिक्विड यांसारख्या साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन खर्चातही भर पडत आहे.

डासांमुळे डेंग्यू, मलेरिया (हिवताप) यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवत शहरात नियमित स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा, गटारींची साफसफाई आणि प्रभावी डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!