यावल तालुक्यातील तरुणाचा पिकअप वाहनाच्या धडकेत मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका २२ वर्षीय तरुणाचा पिक अप वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे सोमवार रोजी दुपारी बस स्थानकासमोर घडली.
दिवाळी साजरी करण्यासाठी वापी येथून आपल्या गावी किनगावला आलेल्या आदित्य या तरुणाचा बसस्थानकाजवळ भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आदित्य उर्फ बाळा प्रमोद पाटील (वय ३०,रा. किनगाव बु. ता.यावल) हा तरुण वापी (गुजरात) येथे खाजगी कंपनीत कामाला होता. रविवार रोजच तो गावी यावल तालुक्यातील किनगाव येथे दिवाळी निमित्त आला होता.
सोमवारी दुपारी दुचाकी क्रमांक एमएच १९ ईजे २१७० ने आदित्य घरून निघाला होता. तेव्हा, यावलहून चोपड्याकडे विद्युत खांब घेऊन जाणाऱ्या पिकअप (एमएच १९ बीएम ४३२) ने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत आदित्य गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्य हा घरातील कर्ता सदस्य होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पिकअप चालक यावल पोलीस ठाण्यात हजर झाला.आदित्यच्या पश्चात आई, दोन लहान भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे.

