देशात ३२ विद्यापीठ बोगस, महाराष्ट्रातील “या” २ विद्यापीठांचा समावेश
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | देशात बनावट विद्यापीठांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत असून, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अशा विद्यापीठांची संख्या आता ३२ झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे.
देशात शिक्षणाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असून, राजधानी दिल्लीत तब्बल १२ विद्यापीठे बोगस असल्याचे आढळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील काही संस्था यूजीसी मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर आहेत. या यादीनुसार उत्तर प्रदेश राज्यात दिल्लीनंतर सर्वाधिक ४ बनावट विद्यापीठे आहेत. गेल्या दोन वर्षांत देशातील अशा संस्थांची संख्या २० वरून ३२ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थी आणि पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रवेश घेताना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. या नवीन आकडेवारीनुसार बनावट विद्यापीठांचे जाळे नवीन चार राज्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामध्ये हरियाणा राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश राज्यांचा समावेश आहे.
नवीन आकडेवारीनुसार, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी 2, तर हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आढळून आले आहे. या बनावट यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामध्ये राजा अरबी विद्यापीठ नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. देशातील बनावट संस्था किंवा विद्यापीठे परदेशी विद्यापीठांची नावे आणि लोगो वापरून स्वतःला वैध ठरवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून तक्रार केली आहे की, महाराष्ट्रात त्यांचे नाव आणि लोगो वापरून एक बनावट विद्यापीठ कार्यरत आहे. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने पुन्हा विद्यार्थी आणि पालकांना इशारा दिला आहे.
देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील ३२ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल असं आयोगाने स्पष्ट केले.
UGC ने विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेज अथवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचं आवाहन केले आहे. या ३२ विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटलं आहे.
UGC ने सांगितले आहे की, UGC ACT च्या कलम २(एफ) आणि ३ अंतर्गत केवळ मान्यता प्राप्त संस्थांना डिग्री देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या संस्थाव्यतिरिक्त इतर कुठल्याही बनावट विद्यापीठ अथवा संस्थेकडून घेतलेली डिग्री बेकायदेशीर ठरेल असं त्यांनी म्हटलं. यूजीसीच्या या यादीत दिल्लीत सर्वाधिक १२ विद्यापीठे बनावट असल्याचं पुढे आले आहे. दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात ४ विद्यापीठांना बनावट ठरवण्यात आले आहे. इतर राज्यातही काही शिक्षण संस्था कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने माहिती दिली आहे.
कोणत्या राज्यात किती बनावट विद्यापीठे?
दिल्ली – १२
उत्तर प्रदेश – ४
आंध्र प्रदेश – २
कर्नाटक – २
केरळ – २
महाराष्ट्र – २
पुदुच्चेरी – २
पश्चिम बंगाल – २
अरुणाचल प्रदेश – १
हरियाणा – १
झारखंड – १
राजस्थान – १
या ३२ विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
