शिक्षण विभागाचा मोठा निर्णय : आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून नजर! प्रत्येक जिल्ह्यात ‘विषय समित्या’
मुंबई, मंडे टु मंडे न्युज| राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा स्तरावर विषयनिहाय शिक्षकांच्या ‘विषय समित्या’ स्थापन करण्याचा आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे. ८ जुलै २०२६ रोजी शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप अशा समित्या स्थापन झालेल्या नाहीत, तेथे त्या तात्काळ स्थापन करण्याचे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
आता व्हॉट्सॲप ग्रुपवरून होणार थेट मॉनिटरिंग
कामात तत्परता आणि सुसूत्रता यावी यासाठी प्रत्येक विषय समितीचा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाणार आहे. या ग्रुपमध्ये संबंधित अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि विषय समितीचे सदस्य सहभागी असतील. जिल्हास्तरासोबतच राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला जाणार असून, यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयातील उत्कृष्ट, निवडक आणि नवोपक्रमशील पाच शिक्षकांचा समावेश केला जाईल.
‘परख’ सर्व्हेक्षणानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये
‘परख’ सर्व्हेक्षणानुसार इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विषय समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्थापन करण्यात आलेल्या सर्व विषय समित्यांचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


