“हम दो, हमारे दो” धोरणाला हरताळ? लोकसंख्या वाढीसाठी तिसऱ्या अपत्यासाठी ३० तर चौथ्या अपत्यासाठी ४० हजार कॅश ऑफर, राज्य सरकारची नवी योजना
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या कित्येक दशकांपासून देशात हम दो, हमारे दो असे धोरण राबवण्यात येत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी आणि राजकीय पदांसाठी दोन मुलांचं धोरण असताना आंध्र प्रदेश सरकारने लोकसंख्या वाढवण्यासाठी साठी एक भन्नाट ऑफर ची घोषणा केली असून आंध्र प्रदेशानं चार मुलांच्या धोरणाला प्रोत्साहन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील घटत्या लोकसंख्या दराविरोधात मोठी घोषणा केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नापेटा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात नायडू यांनी तिसरे मूल जन्मास घालणार्या कुटुंबाला ३० हजार रुपये आणि चौथे मूल जन्माला घालणार्या कुटुंबाला प्रोत्साहन म्हणून ४० हजार रुपये देण्याचा निर्णय जाहरी केला आहे. एका महिन्यात या धोरणाची विस्तृत माहिती समोर येईल. पण या घोषणेमुळे देशाच्या लोकसंख्या वृद्धीला आळा घालण्याच्या धोरणाला हरताळ फासला गेला आहे. नायडू यांच्यावर आता टीका होत आहे. एकीकडे देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात असून दुसरीकडे लोकसख्या वाढीसाठी भन्नाट ऑफर दिली जात असल्याने देशभरात हा विषय चर्चेचा बनला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी स्वर्ण आंध्र- स्वच्छ आंध्र कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली. राज्य सरकार आता लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील दिशा निर्देश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्य सरकार तिसरे अपत्य जन्मास घालणाऱ्या कुटुंबाला ३० हजार रुपये आणि चौथ्या मुलाच्या जन्मासाठी ४० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देणार आहे.तसेच तिसऱ्या अपत्याच्या पोषणासाठी सरकारकडून ५ वर्षे दरमहा ₹१,००० इतकी आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पूर्वी चंद्रबाबा नायडू यांनी देशातील लोकसंख्या वृद्धी दरावर अनेकदा चिंता व्यक्त करत हम दो, हमारे दो असा नारा दिला होता. त्यांनी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. अनेक कार्यक्रमात त्यांनी अशी जाहीर भूमिका घेतली होती. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नायडू यांनी अचानक यूटर्न घेतला आहे. आता समाजाने जन्मदर वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी अजब भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेने सर्वच हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी ५ मार्च रोजी विधानसभेत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दुसऱ्या मुलाच्या जन्मावर २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.तर आरोग्य मंत्री सत्या कुमार यादव यांनी तिसरे आणि चौथे अपत्य अथवा त्यापेक्षा अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.
या योजनेच्या घोषणेनंतर, पारंपरिक कुटुंब नियोजन (Family Planning) धोरणाकडून ‘लोकसंख्या वाढवा’ धोरणाकडे वळणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पण या योजनेचा फायदा हिंदू समाजाला कमी आणि अल्पसंख्यांक समाजाला अधिक होण्याचा आरोप करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा