भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

दुहेरी हत्याकांड ; भोंदू बाबाने हत्या केल्याचे उघड, धार्मिक पूजन नंतर क्रूर हत्या…

धुळे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अवघ्या काही तासात या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.बीविशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाजवळ सापडलेला एका रुमालाच्या आधारावर पोलीस तपास या आरोपी पर्यंत जाऊन पोहोचला.दुहेरी हत्याकांड उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

साक्री तालुक्यातील रायपूर ते वर्धाने रस्त्यावर एका तरुणीचा मृतदेह पडला असून मृतदेह एम एच 18 सी एच 8151 क्रमांकाच्या दुचाकीच्या खाली दबलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शी हा अपघाताचा प्रकार असल्याचा बनाव तयार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनास्थळाकडे रवाना केले. या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

यावेळी त्यांना प्राथमिक तपासातच तरुणीच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा वेगळाच प्रकार असल्याचे समजून आले. विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाजवळ तिचा मोबाईल आणि पर्स आढळून आली. यातील कागदपत्रांवरून हा मृतदेह कासारे येथील जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे) या तरुणीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांना देखील ही माहिती देण्यात आली. सदर महिला ही जैताने परिसरातील योगेश बापू खैरनार यांच्याकडे पूजाविधीसाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी खैरनार याच्याकडे चौकशी केली असता जयश्री काकुस्ते आणि जैताणे येथील रहिवासी असणारा अक्षय गंगाधर सोनवणे हे खैरनार याच्याकडे पूजेसाठी आल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी जयश्री काकुस्ते यांच्या मोबाईल मधील कॉल चे विश्लेषण केले. यावेळी शेवटचा कॉल खैरनार यांनाच केल्याचे देखील स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांचे संशयाची सुई सरळ भोंदू बाबा खैरनार याच्याकडे वळाली. त्यांनी चौकशी केली असता खैरनार याने उडवा उडवीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दुहेरी हत्याकांडाच्या घटनेवरील परदा उचलला गेला.

आधी अतिप्रसंगाचा प्रयत्न नंतर खून
जैताणे येथील रहिवासी असणारा योगेश खैरनार हा त्याच्या गोशाळा वजा मठामध्ये पूजाविधी करून भोंदू बाबा चे काम करतो. त्याच्याकडे जयश्री आणि त्यांचा मित्र सोनवणे हे शनि अमावस्या असल्यामुळे पूजेसाठी आले होते. मात्र पूजेला उशीर झाल्याने खैरनार यानेच जयश्री यांना सोडून येण्याचे नाटक केले. एकाच गाडीवर दोघेही जैताने येथून निघाले. पुढे निर्मनुष्य रस्ता लागल्यानंतर खैरनार याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्री यांनी आरडाओरडा केला.

क्रूर पद्धतीने खून
या प्रकारामुळे आपले बिंग फुटू नये, यासाठी खैरनार याने गळा आवळून जयश्री यांची हत्या केली. त्यानंतर अपघाताचा बनाव तयार करून त्याने जैताने गाठले. मात्र त्याला यायला उशीर झाल्याने अक्षय खैरनार याने त्याला मठात जाब विचारला. त्यामुळे खैरनार हा कमालीचा घाबरला. जयश्री काकुस्ते या आपल्याबरोबरच होत्या .ही माहिती केवळ अक्षय सोनवणे यालाच आहे. त्यामुळे हा पुरावा देखील नष्ट करण्यासाठी खैरनार याने लोखंडी राड सोनवणे यांच्या डोक्यात मारून त्याचा देखील खून केला. यानंतर मृतदेह एका पोत्यामध्ये भरून तो विपरीत दिशेला नेऊन टाकला. या पोत्यावर त्याने काटेरी झाडी आणि अन्य वस्तू टाकून कुणाच्याही लक्षात येणार नाही, असा प्रयत्न केला.

कॉल रेकॉर्ड व रुमाल मुळे खूनाची उकल
जयश्री यांचा मृतदेह दुचाकीच्या खाली दाबलेल्या अवस्थेत होता. प्रथमदर्शी पाहताना हा अपघात असल्याचे दिसत होते. मात्र घटनास्थळावर पुरुष वापरणारा रुमाल आढळून आला. तसेच मयत तरूणीच्या गळ्यावर देखील काही वळ दिसून आले. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना संशय आला. परिणामी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी श्वान पथक , ठसे तज्ञांचे पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. प्राथमिक तपासात हे हत्याकांड भोंदुगिरीच्या नादी लागल्यानं घडल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी एका संशयित भोंदुला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

घटनास्थळी सापडलेल्या या रुमालाच्या आधारावर श्वानपथकाने देखील तपासाचे धागेदोरे खैरनार यांच्यापर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे जयश्री यांच्या फोन मधून खैरनार यांना फोन केला गेल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे पोलीस तपास सरळ भोंदू बाबा असणाऱ्या खैरनार याच्या पर्यंत जाऊन पोहोचला. आणि चौकशीत हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार खैरनार याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!