विश्वकल्याण, शेतकरी समृद्धी आणि दुष्काळ निवारणासाठी श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे भव्य मारुती यज्ञ संपन्न!
२१ हरिभक्त यजमानांचा सहभाग; वेदोक्त मंत्रोच्चारात भक्तिभावाने यज्ञपूजन व आहुती
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज || ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ अर्थात, सर्वांचे कल्याण होवो, सर्वजण सुखी व निरोगी राहोत, या उदात्त भावनेतून श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे विश्वकल्याण, निसर्गाचा समतोल आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, या मंगल संकल्पाने विशेष मारुती यज्ञाचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले असून, त्यांच्या जीवनात चिंतेचे आणि निराशेचे सावट पसरले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका सहन करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना मानसिक बळ, धीर आणि नव्या आशेची प्रेरणा मिळावी, पर्जन्यवृष्टी होऊन दुष्काळाचे संकट दूर व्हावे, निसर्गाचा समतोल राखला जावा आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, या पवित्र हेतूने या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन श्री स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यज्ञाचे पौराहित्य परमपूज्य सद्गुरू शास्त्री स्वामी भक्तिप्रियदासजी यांनी अत्यंत विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने केले. या यज्ञामध्ये तब्बल २१ हरिभक्तांनी यजमान म्हणून सहभाग नोंदविला. वेदमंत्रांचा मंगलमय घोष, शास्त्रोक्त विधी, भक्तिभावपूर्ण पूजन आणि श्रद्धेने दिलेल्या आहुतींमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. यावेळी २१ यजमानांनी मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होत, दुष्काळाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पुन्हा हिरवाई नांदावी, त्यांच्या कष्टांना समृद्धीचे फळ मिळावे, सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समाधान लाभावे आणि समस्त विश्वाचे मंगल व्हावे, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.

यासोबतच प्रत्येकाच्या वैयक्तिक व कौटुंबिक कल्याणासाठीही प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था, सावदा चे उपाध्यक्ष परमपूज्य सद्गुरू शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी यांनी उपस्थित राहून सर्वांना आशीर्वाद दिले. आपल्या मनोगतात त्यांनी या यज्ञाच्या आयोजनाचे विशेष कौतुक केले. विश्वकल्याणाची भावना हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचे अधोरेखित करत, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, विशेषतः दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदावी, यासाठी स्वामीनारायण भगवान आणि कष्टभंजनदेव हनुमानजी महाराज यांच्या चरणी त्यांनी प्रार्थना अर्पण केली.

यज्ञाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी माधवप्रियदासजी, पुजारी सत्यप्रकाशदासजी, पारस, मानस भगत, वीरा भगत, शिवा भगत यांच्यासह अनेक हरिभक्तांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले. याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी नंदू पाटील सर, श्री शिवाजी भारंबे, मोहन पाटील, सीताराम कोष्टी, कोमल चौधरी, चेतन चौधरी, आर्यन पाटील, ईशान पाटील, चंद्रकांत पाटील, जयेश पाटील, खुशाल भंगाळे, गितेश नेते, रवींद्र महाजन यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व हरिभक्त उपस्थित होते.
परिसरातील असंख्य भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून मारुतीरायाचे दर्शन घेतले तसेच या पवित्र यज्ञकार्यात भक्तिभावाने सहभाग नोंदविला. अखेरीस सर्व यजमान व उपस्थित भाविकांनी श्रद्धापूर्वक यज्ञकुंडात आहुती अर्पण करून यज्ञाची पूर्णाहुती केली. भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता, सामूहिक प्रार्थना, त्याग, समर्पण आणि लोककल्याणाची उदात्त भावना व्यक्त करणारे पवित्र माध्यम मानले जाते. याच भावनेचा प्रत्यय सावदा येथील या मारुती यज्ञाच्या निमित्ताने आला. ‘इदं न मम’ हे सर्व माझे नसून समष्टीच्या कल्याणासाठी आहे, या त्यागभावनेतून संपन्न झालेल्या या यज्ञाने शेतकरी बांधवांच्या मनात आशेचा नवा दीप प्रज्वलित करण्याचा आणि समाजात सामूहिक कल्याणाची भावना दृढ करण्याचा मंगल संदेश दिला.





