जळगाव जिल्ह्यातील ३१७ शाळांची होणार वार्षिक तपासणी ; रावेर, यावल, पारोळा, पाचोरा,भुसावळ सह ३१ अधिकाऱ्यांवर जबाबदारी
रावेर. मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांची वार्षिक तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल ३१७ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असून, या कामासाठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ३१ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना शाळानिहाय जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे.
तपासणीच्या नियोजनात सहाय्यक शिक्षण निरीक्षक तथा उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांच्याकडे सर्वाधिक ६६ शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रावेरचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र बाखल यांच्याकडे २५, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता जगन्नाथ दरंदले यांच्याकडे २२, तर अधिव्याख्याता शिवाजी ठाकूर यांच्याकडे १७ शाळांच्या तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

पारोळ्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ पाटील आणि शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडे प्रत्येकी १३ शाळा, भुसावळचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकळे यांच्याकडे १२ शाळांची जबाबदारी आहे.
चाळीसगावचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, यावलचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील आणि माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्याकडे प्रत्येकी ११ शाळांची तपासणी सोपविण्यात आली आहे.
माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण आणि डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे यांच्याकडे प्रत्येकी १० शाळांची जबाबदारी आहे.

पाचोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार, भडगावचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता संगीता पाटील, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गावळी आणि प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्याकडे प्रत्येकी पाच शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजया सारोडे आणि सहाय्यक संचालक मंदाकिनी देवकर यांच्याकडे प्रत्येकी चार शाळांची तपासणी सोपविण्यात आली आहे.

चोपड्याचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे आणि शाळा तपासणी अधिकारी अजित तडवी यांच्याकडे प्रत्येकी दोन शाळांची जबाबदारी आहे.
जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील आणि जामनेरचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांच्याकडे प्रत्येकी तीन शाळांची तपासणी देण्यात आली आहे. तर नाशिक उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण निरीक्षक श्रीधर देवरे आणि सहाय्यक संचालक डॉ. सरोज जगताप यांच्याकडे प्रत्येकी एका शाळेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शाळांच्या कामकाजावर राहणार लक्ष
या वार्षिक तपासणीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. ३१७ संस्थांच्या तपासणीसाठी ३१ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने आगामी काळात शिक्षण विभागाची ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.




