संघर्षातून यशाकडे झेप : संतोष कैलास कोळी यांची प्रेरणादायी कहाणी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबादच्या मातीतून उगवलेले एक साधं पण जिद्दी व्यक्तिमत्त्व—संतोष कैलास कोळी. परिस्थितीशी दोन हात करत, स्वप्नांना पंख देणाऱ्या या तरुणाने आपल्या अथक मेहनतीच्या बळावर यशाचा झेंडा रोवला आहे.
लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत आणि पुढील शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे पूर्ण करत असताना, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडील MIDC मध्ये कष्टाची कामे करत, तर लहान संतोष चा सांभाळ मामांनी केला.
खेळाची आवड अंगी बाळगणारा हा मुलगा परिस्थितीमुळे मात्र आपल्या छंदांना वेळ देऊ शकत नव्हता. ११ वीत नूतन मराठा विद्यालयात कॉमर्स शिक्षण घेत असताना, घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी पार्ट-टाईम काम करण्याचा प्रयत्न केला; पण अभ्यासावर परिणाम होत असल्याने त्यांनी काम सोडले. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. याच दरम्यान आलेल्या लॉकडाऊनने परिस्थिती आणखी कठीण केली.
मात्र, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतोच! २०२१ साली धनराज कानडे यांच्या मार्गदर्शनामुळे संतोष यांनी पोलीस भरतीचा मार्ग निवडला. सुरुवातीला अपयश आले, २०२३ ची पहिली भरती हुकली. घरच्यांना वाटत होते की गरीब घरातील मुलांना नोकरी मिळत नाही; पण संतोष यांनी हार मानली नाही.
कल्पेश भाऊ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली. गावात मोफत टेस्ट, रनिंगचे प्रशिक्षण यामुळे त्यांना नवी दिशा मिळाली. २०२४ च्या भरतीत फक्त ५ गुणांनी अपयश आले, पण यावेळीही त्यांनी खचून न जाता संघर्ष सुरूच ठेवला
घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी भारत गॅस येथे नोकरी करत, सकाळी अभ्यास आणि रात्री काम असा कठोर दिनक्रम त्यांनी पाळला. याच काळात MSF मध्ये निवड होऊन ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
नशिबाने पुन्हा एक संधी दिली —आणि यावेळी संतोष सज्ज होते! अखेरच्या प्रयत्नात त्यांनी सर्व जुने पेपर्सचा कसून सराव केला, ग्राउंडमध्ये ४३ गुण मिळवले आणि लेखी परीक्षेत तब्बल ८९ गुण मिळवत SBC गटातून प्रथम क्रमांक पटकावला. मित्रांच्या साथ-सहकार्याने, त्यांच्या अभ्यासासाठी दिलेल्या मदतीने आणि स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर संतोष यांनी आपले वर्दीचे स्वप्न साकार केले.
अखेर त्यांची निवड छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरतीमध्ये झाली. ही केवळ यशोगाथा नाही, तर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा जिवंत आदर्श आहे. संतोष कोळी यांची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक तरुणांना नवसंजीवनी देणारी ठरेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा